मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नरकचतुर्दशी दिनी व्यंगचित्राच्या माध्यमातून 'धुलाई' केली आहे. राज ठाकरे हे फडणवीसांचा उल्लेख कायम भाजपकुमार थापाडे असा करत असतात. आता व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांनी, भाजप सरकारच्या धुलाईसाठी जनता कशी अतूर झाली आहे, हे दाखविले आहे.
राज ठाकरे यांची व्यंगचित्र मालिका सोमवारपासून सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी त्यांनी मोदी सरकारच्या काळात भारतावर अनेक अत्याचार झाले असून देश आयसीयूमध्ये असल्याचे दाखवले होते. आज (मंगळवार) नरकचतुर्दशी आहे. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व आहे. हेच शिर्षक देत राज यांनी मुख्यमंत्री अभ्यंगस्नानाआधी अंगाला तेल लावून घेत असल्याचे दाखवले आहे. त्याचेवळी एक व्यक्ती येते आणि त्यांच्या कानात सांगते, की ‘साहेब... अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आलाय, पाठवू का?’ खिडकीमध्ये अनेक लोक उभे असलेले दाखवण्यात आले आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून राज यांनी फडणवीस सरकारवर जनता नाराज असून त्यांची धुलाई करण्यास अतूर असल्याचेे दाखविले आहे. राज ठाकरे त्यांच्या फेसबुक पेेजवर रोज ही व्यंगचित्रे प्रसिद्ध करत आहेत.
राज ठाकरे आपल्या
भाषणांमधून फडणवीसांवर भाजपकुमार थापाडे अशी टीका करत असतात. दिवाळीच्या
निमित्ताने त्यांनी सुरु केलेल्या व्यंगचित्र मालिकेतही त्यांनी फडणवीसांवर आपले
कुंचल्यांचे फटकारे चालवले आहेत. याला मुख्यमंत्री कसे उत्तर देतात, हे पाहाणे
महत्त्वाचे आहे. व्यंगचित्रांच्या
माध्यमातून राज ठाकरे रोज भाजपला फटकारत आहेत. या व्यंगचित्र मालिकेकडे आता
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

















